पिंपरी : ‘झेप्टो’ डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१४ नोव्हेंबर) रात्री ११:३०च्या सुमारास निगडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या ग्रेट सेपरेटर रस्त्यावर बजाज ऑटोसमोर आकुर्डी येथे घडली.
अंकित अशोक मगर (निगडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंकितचे वडील अशोक उत्तम मगर (वय ५५) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप उदेशराम कुमार (वय २८, रा. औरंगाबाद, बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंकित हा ‘झेप्टो’ डिलिव्हरी करण्यासाठी निगडीकडून पिंपरीकडे चालला होता. बजाज ऑटोसमोर आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर रहदारीकडे दुर्लक्ष करून मागे घेतला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या अंकितच्या दुचाकीला कंटेनरची धडक बसली. या भीषण अपघातात अंकितच्या डोक्याला, दोन्ही हातांना व दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला; तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर आरोपीने जखमी तरुणाला कोणतीही वैद्यकीय मदत न देता पळ काढला.