सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळण्याआधीच राजकीय संघर्ष तापला असून, भाजप नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात मतभेद सुरू आहेत. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उडी घेतली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सूर्या प्रकल्पातून ठाण्याला अतिरिक्त ६० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे वचन दिले होते. मात्र भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांनी या प्रकल्पातील कोणतेही पाणी ठाण्याला देण्यास विरोध दर्शविला आहे. या भूमिकेस राष्ट्रवादी काँग्रेस शपचे नेते मनोज प्रधान यांनी विरोध केला आहे.या योजनेच्ा पहिल्या टप्पा पूर्ण झाला असून मिरा-भाईंदरसाठीच्या २१८ एमएलडी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीचे आणि जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी त्यांना मिळणार आहे. तरीही अद्याप पाणी मिळाले नसेल, तर ज्या पालिकेत ते सत्तेवर आहेत, त्या प्रशासनाकडून त्यांना वेळेत कामे करून घेता आली नाहीत. हे त्यांचे अपयश आहे. वसई-विरारमध्ये पाणीपुरवठा होत असेल आणि मिरा-भाईंदरमध्ये होत नसेल, तर त्याचे आत्मचिंतन मेहता यांनी करावे, असा टोला प्रधान यांनी लगावला.