संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा आणि जलसंधारणाची कामे कालमर्यादेत पूर्ण करा, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्रालयात येवला व निफाड तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना, साठवण तलाव आणि नदीसंवर्धन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. येवला तालुक्यातील राजापूरसह ४० गावे आणि धूळगावसह १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे आवश्यक मान्यता घेऊन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूरसह १६ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करण्यास सांगितले.सावरगाव साठवण तलावाच्या भूसंपादनासाठी आवश्यक २३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी तातडीने सादर करावी, तसेच ममदापूर, महालखेडा व देवना येथील साठवण तलावांची कामेही वेगाने पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. लासलगावच्या शिवनदी आणि विंचूरच्या लोणगंगा नदी संवर्धन प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.