एसटीला दिवाळी पावली; उत्पन्न वाढले

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
एसटीला दिवाळी पावली; उत्पन्न वाढले
दिवाळी सणाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यात एसटी महामंडळाने मोलाची भूमिका बजावली. दिवाळी कालावधीत नाशिक विभागाने तब्बल २५ कोटी ६७ लाख रुपयांचे वाहतूक उत्पन्न मिळविले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ कोटी ३५ लाख रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली. गतवर्षीपेक्षा यावेळी बसने एक लाख दोन हजार किलोमीटर अधिक प्रवास केला.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चाकरमानी गावी जाण्यास प्राधान्य देतात. पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरसह धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या यंदा मोठी होती. ही गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागाने जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
दिवाळी कालावधीत विभागातील ८०१ वाहने प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आली. या बसने एकूण ४३ लाख १५ हजार किलोमीटर प्रवास केला. यातून नाशिक विभागाला २५.६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेषतः पुणे मार्गावरील वातानुकूलित बससेवांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मार्गावरील सर्व वातानुकूलित बसगाड्यांचे आरक्षण शंभर टक्के झाले होते.

याशिवाय धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह सप्तशृंगगड आणि त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांवरून मागणीनुसार जादा बस सोडण्यात आल्या.