विज्ञान साहित्य नांदी संमेलन २६ नोव्हेंबरला

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

‘स. प. महाविद्यालयाच्या मैदानाजवळील ज्ञानमंडपम येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे प्रमुख पाहुणे असणार आहेत,’ अशी माहिती विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सचिव कौस्तुभ साखरे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रमा कुलकर्णी, ‘पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या विभागप्रमुख डॉ. संजीवनी सोनार, ‘इनक्युबेशन’ केंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दुराफे उपस्थित होते.
‘शिक्षण, विज्ञान आणि साहित्य तिन्ही गोष्टी संमेलनात एकत्र अनुभवता येणार आहेत. तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देतानाच नवनिर्मितीला चालना मिळावी, हा संमेलनाचा उद्देश आहे. विज्ञान संशोधन व स्टार्टअप संस्कृती विकसित होण्यास या संमेलनामुळे निश्चितच मदत होईल,’ असे काळकर यांनी सांगितले. ‘विज्ञानकथा वाचन, विज्ञान साहित्यिक परिसंवाद, शास्त्रज्ञांशी संवाद व पॉडकास्ट अशी विशेष सत्रे होतील,’ असे साखरे यांनी सांगितले.