शेतमाल साठवणूक क्षमता वाढावी

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

वाढीव मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव

Maharashtra Times
‘शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी उत्पादनाइतकीच त्याच्या साठवणुकीची सक्षम व्यवस्था महत्त्वाची आहे. आधुनिक कोल्ड चेन यंत्रणेमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यासाठी या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याची गरज आहे,’ असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग’, ‘रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (इशरे) यांच्या वतीने कृषी महाविद्यालय मैदानावर आयोजित रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’ या आंतरराष्ट्रीय तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. महापौर मंजूषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल उगले-तेली, कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, ‘इशरे’चे अध्यक्ष डॉ. सरवानन, ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’चे अध्यक्ष अरविंद सुरंगे उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्याने अपेक्षित दर मिळत नाही. कोल्ड चेन व्यवस्थेचा विस्तार झाल्यास शेतकऱ्यांना भविष्यात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र आणि शासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास उद्योगनिर्मितीला चालना मिळेल; तसेच नवउद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण होतील,’ असे भरणे यांनी सांगितले.

‘शीत उद्योगांतील कंपन्या, तज्ज्ञ अभियंते, डिझायनर्स, सल्लागार, कंत्राटदार आणि शैक्षणिक संस्थांचे भक्कम जाळे असल्याने पुण्याला देशाची ‘रेफ्रिजरेशन कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. या क्षेत्राच्या विकासात इशरेच्या पुणे विभागाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,’ असे सुरंगे यांनी सांगितले. डॉ. सरवानन यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी संस्थेतर्फे पाच लाख रुपयांची देणगी देण्याची; तसेच तीन पीएच.डी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. ग्रामीण भागात शीतगृहांची उभारणी आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या साठवणूक केंद्रांना प्रोत्साहन दिल्यास वीजटंचाई, खर्चाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यामुळे फळे, भाजीपाला, फुले आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा दीर्घकाळ टिकून राहील, असा विश्वास परिषदेतील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

‘दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ९५ लाख शेतकऱ्यांपैकी दहा लाख शेतकऱ्यांना मदत मिळायची राहिली आहे. वाढीव मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. खरीप पीक वाया गेले. मात्र, रब्बी पिकांसाठी जास्तीत जास्त मदत देण्यात येईल,’ असे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.