अशोक जोशी यांचा गच्चीवरून पडून मृत्यू

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अशोक जोशी यांचा गच्चीवरून पडून मृत्यू
भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी (वय ९०) यांचे बुधवारी सकाळी वानवडीतील साळुंखे विहार येथे निधन झाले. निवासी इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांत सहभाग घेतला होता.

अशोक जोशी हे साळुंखे विहार येथील निवासी इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत राहत होते. ते बुधवारी सकाळी इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्यानंतर काही वेळाने ते इमारतीच्या आवारात पडलेल्या अवस्थेत आढळले. स्थानिक रहिवाशांनी याबाबत घरकाम करणाऱ्या व्यक्तीला माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णवाहिकेतून लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मुलीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. जोशी यांना यापूर्वी चक्कर येण्याचा त्रास होता. त्यातून ते घरी काही वेळा पडलेही होते, असे त्यांच्या मुलीने पोलिसांना सांगितले. कुटुंबीयांनी घरकाम करणाऱ्या व्यक्तीबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. अशोक जोशी त्यांनी लष्करात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग (डीजीएमटी) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.