शिवीगाळ प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
पुणे : महिला कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रास्ता पेठेतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापिकेविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शाळेतील कर्मचारी महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, ४१ वर्षीय मुख्याध्यापिकेविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला आणि मुख्याध्यापिका रास्ता पेठेतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कामाला आहेत. गेल्या महिन्यात १८ ऑक्टोबरला मुख्याध्यापिकेने जातिवाचक शिवीगाळ केली. ‘तुमची काम करायची लायकी नाही,’ अशा शब्दांत अपमानित केले, असा आरोप तक्रारदार महिलेने केला. सहायक आयुक्त सचिन हिरे तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शाळेतील इतर कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.