विदर्भाच्या भूगर्भात हालचालींचे नवे संकेत

Contributed by: ललित पतकीlalit.patki@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
विदर्भाच्या भूगर्भात हालचालींचे नवे संकेत
थ्वीचा अंतर्भाग मुख्यतः गाभा (कोअर), प्रावरण (मॅन्टल) आणि भूकवच (क्रस्ट) अशा तीन स्तरांचा बनलेला आहे. भूकवच आणि प्रावरणाचा वरचा कठीण भाग मिळून ‘लिथोस्फिअर’ तयार होते. त्याचे अनेक मोठ्या आणि लहान टेक्टॉनिक प्लेट्समध्ये विभाजन झाले आहे. या प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात, एकमेकांकडे सरकतात किंवा एकमेकांच्या बाजूने घासत पुढे जातात. पृथ्वीच्या आतील उष्णतेमुळे प्रावरणामध्ये होणाऱ्या संथ हालचालींमुळे प्लेट्सची गती सुरू असते. भारतीय प्लेट उत्तरेकडे सरकत युरेशियन प्लेटला धडकत आहे. याच प्रक्रियेतून हिमालयाची निर्मिती झाली असून ही हालचाल आजही सुरू आहे. प्लेट्सच्या हालचालींमुळे खडकांमध्ये ताण साठत जातो. हा ताण सहन करण्याची क्षमता संपल्यानंतर खडकांमध्ये अचानक विस्थापन होते आणि ऊर्जा बाहेर पडते. त्यातून भूकंपाच्या लहरी निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा बाहेर पडण्याच्या ठिकाणाला भूकंपाचा उगमबिंदू, तर त्याच्या थेट वर पृष्ठभागावरील ठिकाणाला भूकंपकेंद्र (एपिसेंटर) म्हणतात. भूकंपाच्या वेळी प्राथमिक (पी) आणि दुय्यम (एस) लहरी निर्माण होतात. या लहरी पृथ्वीच्या अंतर्भागातून प्रवास करतात. त्यांचा परिणाम जमिनीच्या रचनेनुसार बदलतो. कठीण खडकांच्या तुलनेत काही मऊ, गाळयुक्त जमिनींमध्ये कंपन अधिक जाणवू शकते.

मध्य भारतातील नर्मदा-सोन रेषीय क्षेत्र
याचेच उदाहरण म्हणजे मध्य भारतातील भूकंपांच्या अभ्यासात नर्मदा-सोन रेषीय क्षेत्र. या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. सुमारे एक हजार ते बाराशे किलोमीटर लांबीचा हा प्राचीन भूगर्भीय पट्टा मध्य भारतातून पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला आहे. या पट्ट्यात नर्मदा उत्तर आणि नर्मदा दक्षिण अशा प्रमुख भूगर्भीय तडे असलेल्या रचना आहेत. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे या भागातील रिफ्ट खोऱ्याची निर्मिती झाली. त्यानंतर नर्मदा नदीने या खोऱ्यात गाळाचे थर साठवले. म्हणजेच नदीच्या गाळामुळे हा भूगर्भीय पट्टा तयार झालेला नाही. भारतीय प्लेटच्या हालचालींमुळे या जुन्या रचनांवर पुन्हा ताण निर्माण होऊ शकतो. २१ मे १९९७ रोजी जबलपूर येथे झालेला ५.८ मॅग्निट्यूडचा भूकंप याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, हे क्षेत्र भारतीय भूखंडातील भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्राचीन रिफ्ट क्षेत्रांपैकी एक आहे.

प्लेट्सपासून दूरही होतात भूकंप

भूकंप होण्यासाठी दोन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमारेषेवरच हालचाल होणे आवश्यक नाही. प्लेटच्या अंतर्गत भागातही भूकंप होऊ शकतात. त्यांना ‘इंट्राप्लेट अर्थक्वेक’ म्हणतात. भारताचा मोठा भूभाग भारतीय प्लेटच्या अंतर्गत भागात येतो. त्यामुळे हिमालयापासून दूर असलेल्या मध्य भारतातही भूकंप होऊ शकतात. मध्य भारतात नर्मदा-सोन रेषीय क्षेत्र, सातपुडा आणि गावीलगड यांसारख्या जुन्या भूगर्भीय रचना आहेत. पूर्वीच्या हालचालींमुळे या भागांत निर्माण झालेले भूगर्भातील तडे दीर्घकाळ निष्क्रिय राहू शकतात. मात्र, त्यांच्यावर पुन्हा ताण निर्माण झाल्यास हालचाली होण्याची शक्यता असते. एखादा तडा पुन्हा सक्रिय झाला आहे, हे ठरवण्यासाठी केवळ भूकंपांच्या नोंदी पुरेशा नसतात. त्यासाठी भूकंपांची खोली, केंद्रांचे भौगोलिक वितरण आणि जमिनीखालील खडकांच्या रचनेचा अभ्यास करावा लागतो.

सहा महिन्यांत १२ धक्के

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदींच्या संकलनानुसार मे ते नोव्हेंबर २०२६ या काळात विदर्भातील विविध भागांत १२ सौम्य भूकंपांची नोंद झाली. यात नागपूर जिल्ह्यात सात, चंद्रपूरमध्ये तीन, तर गडचिरोली आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका धक्क्याची नोंद आहे. यातील सहा धक्के नोव्हेंबर महिन्यात बसले. विशेषतः उमरेड परिसरात काही दिवसांच्या अंतराने धक्के जाणवले. त्यामुळे या भागातील भूगर्भीय हालचालींचे पुन्हा एकदा सविस्तर निरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे ४ सप्टेंबरला पहाटे ३.६ मॅग्निट्यूडचा भूकंप झाला. त्याचे धक्के अहेरी आणि परिसरातही जाणवले. या घटनेचा संबंध गोदावरी खोऱ्यातील जुन्या भूगर्भीय तडे असलेल्या पट्ट्याशी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भूजलातील दाबबदलांमुळेही काही भूगर्भीय हालचाली होऊ शकतात. मात्र, या विशिष्ट भूकंपामागील कारण अद्याप शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

नागपूर ‘सेफ झोन’मध्ये

भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) भूकंपाच्या संभाव्य धोक्यानुसार देशाची झोन दोन ते पाच अशी विभागणी केली आहे. झोन दोन हा तुलनेने कमी धोक्याचा, तर झोन पाच हा सर्वाधिक धोक्याचा विभाग आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश भाग झोन दोनमध्ये येतो. त्यामुळे या भागातील भूकंपाचा संभाव्य धोका तुलनेने कमी मानला जातो. नागपूर परिसरात दख्खनच्या पठारावरील कठीण बेसॉल्ट खडकांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, केवळ कठीण खडक असल्यामुळे भूकंपाचा धोका नाही, असे म्हणता येत नाही. जमिनीची रचना, गाळाचे थर, भूगर्भातील तडे आणि बांधकामांची गुणवत्ता यांचाही भूकंपाच्या परिणामांवर प्रभाव पडतो. २०२४मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या संस्थेने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, कुही, उमरेड आणि कामठी तालुक्यांतील २१ गावांचा प्राथमिक अभ्यास केला होता. त्यानंतर सुमारे १,४०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सूक्ष्म भूकंपांचे निरीक्षण करण्यासाठी सर्वेक्षणाची तयारी करण्यात आली. या अभ्यासातून स्थानिक भूगर्भीय रचनांचे अधिक तपशीलवार आकलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विदर्भातील अलीकडील सौम्य धक्के मोठ्या भूकंपाचे संकेत आहेत, असे भाकीत करता येत नाही. वारंवार धक्के बसणे म्हणजे भूगर्भातील ताण पूर्णपणे मोकळा होत आहे, असाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळे जीएसआय आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भागातील सूक्ष्म भूकंपांचे सातत्याने निरीक्षण करणे, भूगर्भातील तड्यांचे नकाशे तयार करणे आणि दीर्घकालीन अभ्यास वाढवणे आवश्यक आहे. नागपूर तुलनेने कमी धोक्याच्या विभागात असले, तरी विदर्भाच्या भूगर्भातील हालचालींकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.