वाण धरणाच्या बुडीत क्षेत्रात गाळपेरा

Contributed by: बीड,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

चाऱ्याचे नियोजन

वाण धरणाच्या बुडीत क्षेत्रात गाळपेरा
जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी निर्माण होणारी संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपाययोजना हाती घेतली आहे. दुष्काळामुळे जलाशय, तलाव आणि धरणांमधील पाणीसाठा घटल्याने उघड्या पडलेल्या सुपीक बुडीत जमिनीवर गाळपेरा करून चारा लागवड केली जाणार आहे. यातून जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

परळी तालुक्याची जलवाहिनी समजले जाणारे वाण धरण या भागातील प्रमुख सिंचन प्रकल्प आहे. मात्र, यंदाच्या दुष्काळात हे धरण कोरडे पडले आहे. याच धरणाच्या कोरड्या पडलेल्या बुडीत क्षेत्रातील सुपीक जमिनीवर चारा लागवडीसाठी गाळपेरा पेरणीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण परिसरात स्वतः ट्रॅक्टर चालवत गाळपेरा केला.
भीषण दुष्काळाच्या काळात शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, वाण धरणाच्या गाळात गाळपेरा करण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. पाणीसाठा आटल्याने मोकळ्या झालेल्या बुडीत जमिनीचा चारा उत्पादनासाठी उपयोग होत असल्याने पशुपालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गाळात नैसर्गिक ओलावा आणि पोषक घटक टिकून राहिलेले असल्याने येथे कमी कालावधीत दर्जेदार हिरवा चारा तयार होण्यास मदत होते. दुष्काळामुळे शेतीच्या कामांना मर्यादा आल्या असताना या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पर्यायी चारा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी या गाळपेरा लागवडीचा लाभ घेऊन जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. टंचाईच्या काळात शासकीय यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा प्रयोग इतर जलाशयांच्या बुडीत क्षेत्रातही राबविता येण्यासारखा असून, यामुळे पशुधन संवर्धनाला बळ मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.