अग्निवीरांची माहितीचोरी

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

२२ जणांना अटक

Maharashtra Times
हरियाणातील वल्लभगढ येथील १४ वर्षीय मुलाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर एक वेबसाइट हॅक केल्याचा व ‘अग्निवीर’ जवानांशी संबंधित चार हजार जणांची गोपनीय माहिती ‘डार्क वेब’वर ५०० डॉलरना विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाने माजी अग्निवीरांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी आणि इतर सरकारी विभागांमधील रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तयार केलेल्या एका चाचणी वेबसाइटवर अनधिकृत प्रवेश मिळवला. तेथून माहिती चोरली आणि डार्क वेबवर एक जाहिरात पोस्ट केली. त्यात त्याने सुमारे चार हजार ‘अग्निवीरां’ची वैयक्तिक माहिती असल्याचा दावा केला आणि ती ५०० अमेरिकी डॉलरला विकण्यात येईल, असे म्हटले होते.
माहिती मिळवण्यासाठी एआय साधनांचा वापर केल्याचा संशय आहे; तसेच वेबसाइटमध्ये प्रवेश करण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली गेली, याचा तपास सुरू आहे. या माहितीची व्याप्ती किती आहे, हे निश्चित करण्यासाठी तपासकर्ते आता तिची छाननी करीत आहेत. प्राथमिक चौकशीनंतर त्याला कुटुंबाच्या स्वाधीन केल्याचेही सांगण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पाच दिवस चालवलेल्या धडक मोहिमेत २२ जणांना अटक केली आहे. यामध्ये घातक सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांचाही समावेश आहे. हे आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या जाळ्याशी संबंधित होते.