मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात विषारी दारू सेवन केल्याने १६ जणांचा मृत्यू झाला, तर ६००हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
चकपीकारोंग आणि आसपासच्या भागांतील अनेक रुग्णांना १८ नोव्हेंबरपासून इम्फाळमधील जेएनआयएमएस, आरआयएमएस, शिजा आणि बाबिना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांना मिथेनॉलमुळे विषबाधा झाल्याचा संशय आहे. याशिवाय ३४६ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री युमनाम खेमचंदसिंह यांनी शुक्रवारी शिजा आणि बाबिना रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.प्रशासनाने औषधे आणि ऑक्सिजनसह चार जलद प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही चंदेलकडे रवाना झाले आहे. ‘सरकार या प्रकरणाची चौकशी करील आणि दोषींवर कारवाई केली जाईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, संशयित विषारी दारू काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून खरेदी करण्यात आली होती.