विदर्भाची गुजरात संघावर मात

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

एलिट ‘ड’ गटात विदर्भ दुसरा

विदर्भाची गुजरात संघावर मात
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करून विदर्भाने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुजरातवर पाच विकेटनी मात केली.

ही लढत प्रत्येकी १३ षटकांची खेळवण्यात आली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२८ धावा केल्या. प्रत्तुतरादाखल विदर्भाने एक चेंडू राखून पाच विकेटच्या मोबदल्यात विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार अथर्व ताइडे आणि दानिश मालेवार यांनी ८.४ षटकांत ९१ धावांची सलामी देऊन विजयाचा पाया रचला. मात्र, बिनबाद ९१ वरून विदर्भाची ५ बाद ११९ अशी स्थिती झाली होती. विजय हातातून सुटतो की काय असे वाटत असताना वरुण बिश्तने षटकार ठोकून विदर्भाचा विजय निश्चित केला. विदर्भाकडून अथर्वने २८ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह ४४, तर दानिशने २९ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह ४३ धावा केल्या.
तत्पूर्वी, गुजरातकडून आर्या देसाई आणि उर्विल पटेल यांनी ४.१ षटकांत ५४ धावांची सलामी दिली. उर्विल १६ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह ३५ धावा करून बाद झाला. यानंतर आर्याने खिलान पटेलच्या साथीने डाव सावरला. मात्र, ही जोडी फुटली आणि फटकेबाजीच्या प्रयत्नात गुजरातचे फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले.

संक्षिप्त धावफलक : गुजरात - १३ षटकांत ७ बाद १२८ (आर्या देसाई ४१, उर्विल पटेल ३५, खिलान पटेल २६, यश ठाकूर ३-०-२६-२, यश कदम ३-०-२४-२, पार्थ रेखाडे २-०-१५-३) पराभूत वि. विदर्भ - १२.५ षटकांत ५ बाद १३१ (अथर्व ताइडे ४४, दानिश मालेवार ४३, रविकुमार समर्थ १६, वरुण बिश्त नाबाद ९, अर्झान नागवास्वाल ३-०-३२-२, हर्ष पटेल ३-०-२०-२).

महाराष्ट्र संघाचा

लढा अपयशी

पुणे : साहिल पारख, पृथ्वी साव, अर्शिन कुलकर्णी यांनी आक्रमक अर्धशतके ठोकली खरी; पण सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्ध विजय मिळवण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही. महाराष्ट्राने ही लढत पाच धावांनी गमावली. या पराभवाने महाराष्ट्राची वाटचाल अवघड झाली आहे. पाच लढतींनंतर महाराष्ट्र संघ आठ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला पाचपैकी केवळ दोन विजय मिळवता आले आहेत. दुसरीकडे, मध्य प्रदेशने अव्वल क्रमांक आणखी मजबूत केला. संघाने पाचपैकी चार लढती जिंकून १६ गुणांसह अव्वल क्रमांक कायम राखला.

संक्षिप्त धावफलक : मध्य प्रदेश - २० षटकांत ९ बाद २०८ (हर्ष गवळी ५५, अक्षत रघुवंशी ५०, शिवांगकुमार २३, रजत पाटीदार ३१, राहुल बाथम नाबाद २८, मुकेश चौधरी ४-०-५८-२, विवेक शेलार ४-०-३५-३) वि. वि. महाराष्ट्र - २० षटकांत ६ बाद २०३ (अर्शिन कुलकर्णी नाबाद ५४, पृथ्वी साव ५१, साहिल पारख ५०, हृषीकेश सोनावणे १२, ऋतुराज गायकवाड १४, रामकृष्ण घोष १५, कुमार कार्तिकेय ४-०-३३-२).

विदर्भाने पहिल्या लढतीत गोव्यावर मात केली, तर दुसऱ्या लढतीत ओडिशावर विजय मिळवला. यानंतर हैदराबादवर मात करून विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. विदर्भाची मुंबईविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. यानंतर गुजरातवर मात करून विदर्भाने चौथ्या विजयाची नोंद केली. विदर्भाची पुढील लढत २४ नोव्हेंबरला उत्तराखंडविरुद्ध होईल, तर गटातील अखेरची लढत छत्तीसगडविरुद्ध २६ नोव्हेंबरला होणार आहे. ‘ड’ गटात विदर्भाचा संघ मुंबई खालोखाल १८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विदर्भाची गुजरात संघावर मात