Ncps Collective Failure In Pune Reason Behind Internal Conflicts
‘हे सामूहिक अपयश’
Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीला मंगळवारी वाचा फुटली. ‘ही जागा पक्षाला न मिळणे हे सामूहिक अपयश आहे,’ अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. विशेष म्हणजे, या जागेबाबतच्या बोलणीच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार या स्वतः उपस्थित होत्या. जागा न मिळाल्याबाबत खेद व्यक्त करून, ‘ही पक्षाची पारंपरिक जागा होती. ती मिळायला हवी होती,’ असेही तटकरे म्हणाले.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्राथमिक बोलणी करण्यासाठी पक्षाकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. त्यानंतर पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पाचपैकी तीन जागा भाजप लढवणार तर प्रत्येकी एक-एक जागा या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणार असे ठरले. यावरून पक्षात कमालीची नाराजी पसरली होती. पक्षाची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाल्याबाबतची चर्चाही पक्षात जोरात सुरू होती. त्यातच तटकरे यांनी याविषयी जाहीर प्रतिक्रिया दिली.‘यासंबंधी चर्चेत पक्षाचे नेतृत्व कमी पडले का,’ याविषयी तटकरे यांनी थेट भाष्य करणे टाळले. ‘याविषयी पक्षांतर्गत बैठकीत चर्चा करण्यात येईल,’ असेही तटकरे या वेळी म्हणाले.