गोळ्या झाडणारे तिघे अटकेत

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गोळ्या झाडणारे तिघे अटकेत
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करून पळालेल्या तीन हल्लोखोरांचा मुंबई पोलिसांनी राजस्थानपर्यंत पाठलाग केला. रविवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुजरात, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांशी सलग पंधरा तास समन्वय ठेवून राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकातून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

फुलसिंग (१८), हृतिककुमार ऊर्फ रोशन (२२), रेहान अन्सारी (१८) अशी तिघांची नावे असून, दोघे मूळचे हरियाणा आणि एक बिहारचा रहिवासी आहे. या आरोपींचे नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.
घटनास्थळापासूनचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिघांचा पाठलाग सुरू केला. प्रत्येक पथकाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला. हल्ल्यानंतर दुचाकीने अंधेरी रेल्वे स्थानक गाठले. तेथून रेल्वेने कांदिवली येथे पोहोचले आणि तेथून सुरतला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. जवळपास पाच तासांचा प्रवास करून सुरत येथे पोहोचल्यावर त्यांनी जेवण केले आणि सुरत रेल्वे स्थानकावरून पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडली. ही एक्स्प्रेस राजस्थानातील कोटा येथे पोहोचताच राजस्थान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांची पथके राजस्थानात पोहोचली असून, त्यांना मुंबईत आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर पळण्यासाठी वापरलेल्या पल्सर या दुचाकीमुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात आणि ओळख पटवण्यात मदत झाली.

हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या आणि गोळी लागून जखमी झालेल्या उमेश चौहान याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ याचीही प्रकृती स्थिर असून, त्याला रुग्णालयातून घरी सोडले आहे. चालक फिरदौस याचीही त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नानावटी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिनद्वारे दिली.

मूळचा बिहारचा असलेला ह्रतिक हा काही दिवसांपासून अंधेरी परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या सांगण्यावरून शूटर फुलसिंग आणि रेहान हे २० दिवसांपूर्वी मुंबईत आले. तेव्हापासून हे तिघेही टायगरच्या मागावर होते. टायगर हा दर शनिवारी आणि रविवारी जमनालाल बजाज मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर दोन रविवारी त्यांनी रेकी केली. हल्ल्याचा प्रयत्नही केला; मात्र गोळीबार करता आला नाही. १८ ऑक्टोबरलादेखील तिघे या परिसरात घुटमळत होते. सामन्यादरम्यान प्रेक्षकांजवळ टायगर आला त्या वेळी ते त्याला लक्ष्य करणार होते; मात्र हृतिक दुचाकी घेऊन तयार नव्हता. अखेर कार घेऊन मैदानाबाहेर आल्यानंतर त्यांनी टायगरवर गोळ्या झाडल्या.

हृतिक हा गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत रॅपिडो बाइक टॅक्सी चालवत होता. मुंबईच्या वाहतूक कोंडीमध्ये त्याला दुचाकी चालवण्याचा चांगला अनुभव होता. यामुळे हल्ल्यानंतर पळून जाताना दुचाकी चालवायची जबाबदारी हृतिककडे देण्यात आली. फुलसिंग आणि रेहान या दोघांनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. फुलसिंगवर कार चोरीचा आणि रेहानवर शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. हृतिक आणि दोघे हल्लेखोर हे सिग्नल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनिल पंडित या बिश्नोई टोळीचा सदस्य असे सांगणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते.