शहराच्या वेगवेगळ्या भागांत सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. हडपसर, येरवडा, रेल्वे स्टेशन भागात जोरदार, कात्रज, आंबेगाव भागात मध्यम तर शहराच्या काही भागात हलक्या सरींचा शिडकावा झाला. उन्हामुळे तापलेल्या वातावरणात थोड्या वेळासाठी गारवा जाणवला. मात्र, पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उकाडा वाढला. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून, आकाश दुपारनंतर ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
शहरात १५ दिवसांत तापमानात वाढ झाली असून, दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. उकाडाही वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’पासून सुटकेसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना सोमवारी थोड्या वेळासाठी दिलासा मिळाला. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी उन्हाची तीव्रता वाढली; पण पाचच्या सुमारास पुन्हा आकाशात ढग दाटून आले. संध्याकाळी ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. हडपसर, विमाननगर, वानवडी आणि पिंपरी-चिंचवडमध्येही चांगला पाऊस पडला. मध्यवर्ती पेठा, शिवाजीनगर आणि औंधमध्ये हलक्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. रात्री साडेआठपर्यंत मगरपट्ट्यामध्ये १४, लोहगाव येथे ७.२ आणि वारज्यामध्ये ६ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातही संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.