आठ शौचालयेच ‘सुलभ’

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आठ शौचालयेच ‘सुलभ’
मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि देखभालीची स्थिती चिंताजनक असल्याचे मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून नुकतेच समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या ८३७ ‘पे-अँड-यूज’ सार्वजनिक शौचालयांच्या सर्वेक्षणात, केवळ आठ शौचालयांना ‘ए’ ग्रेड मिळाली आहे. तर १७३ शौचालयांना सर्वांत तळाची ‘डी’ ग्रेड देण्यात आली आहे. या अहवालामुळे शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था आणि त्यांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सार्वजनिक शौचालयांची सद्यस्थिती तपासण्यासाठी आणि त्यातील त्रुटी शोधण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, मुंबईतील निश्चित केलेल्या एकूण ८९६ सार्वजनिक शौचालयांपैकी आतापर्यंत ८३७ शौचालयांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित शौचालयांची तपासणी सुरू आहे.
मुंबईतील मोठी लोकसंख्या आपल्या गरजांसाठी सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहे. त्यामुळे शौचालयांची सुस्थिती, स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे. शौचालये सुस्थितीत असणे हे केवळ व्यक्तीच्या नव्हे, तर शहराच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, या सर्वेक्षणात ‘ए’ ग्रेड म्हणजे चांगला किंवा उत्तम दर्जा, ‘बी’ ग्रेड म्हणजे सरासरी दर्जा, ‘सी’ ग्रेड म्हणजे खालावलेला दर्जा, तर ‘डी’ ग्रेड म्हणजे अत्यंत खराब स्थिती किंवा संबंधित ठिकाणी शौचालय आढळले नाही, असा निकष ठेवण्यात आला आहे.

‘ए’ ग्रेडसाठी ७५ ते १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. तर २५ पेक्षा कमी गुण मिळालेल्या शौचालयांना ‘डी’ ग्रेड देण्यात आली आहे.