५० किलोंवरील गोणी उचलण्यावर बंदीच

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
५० किलोंवरील गोणी उचलण्यावर बंदीच
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांना दिलासा देणारा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. या कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या किंवा पिशव्यांची चढ-उतार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.

कामगार संघटनांच्या मागण्यांची दखल घेत कामगारमंत्री व पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटना, पणन विभाग आणि माथाडी मंडळांची विशेष बैठक पार पडली. चर्चेअंती कामगार विभागाने परिपत्रक काढून सर्व बाजार समित्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या बाजार समित्यांमध्ये येणार नाहीत, यासाठी जनजागृतीचे निर्देश देण्यात आले. कामगार आयुक्तालयातील सह आयुक्त (माथाडी) आणि माथाडी मंडळांच्या अध्यक्षांना यात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन होत आहे की नाही, याचा नियमित अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.