‘एसआयआर’तील त्रुटींवर आक्षेप

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
objections on voter registration process errors congress demand
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि अनियमितता असल्याचा आरोप करीत पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांनी सोमवारी केली. सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा, या उद्देशाने काही विशिष्ट मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. ‘एसआयआर’ प्रक्रियेतील अडचणी, मतदारांच्या तक्रारी याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच आवश्यक अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन चोकलिंगम यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रात २०२९पर्यंत विधानसभा निवडणूक नसताना ‘एसआयआर’ची घाई कशासाठी, असा प्रश्न काँग्रेसने केला. या प्रक्रियेची मुदत वाढवावी, मतदारांना दावे-हरकतींसाठी आणि त्यावरील कार्यवाहीसाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.