कोका वन्यजीव अभयारण्य परिसरातील ढिवरवाडा गावाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या अस्वलाचे वनविभागाने यशस्वी रेस्क्यू केले. प्राथमिक तपासणीत अस्वलाच्या मागील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. पुढील उपचारांसाठी त्याला गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.
ढिवरवाडा गावालगतच्या स्मशानभूमी परिसरात अस्वल फिरताना गावकऱ्यांना दिसून आले. अस्वल जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी वनरक्षक आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधून वन्यजीव विभागाला माहिती दिली होती.