Demand For Strict Action Against Drug Mafia In Nagpur
‘ड्रग्ज माफियांवर लावा मकोका’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : शहरातील ऑनलाइन गेमिंग , मॅच फिक्सिंग आणि अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी या क्षेत्रातील संघटित टोळ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन दिले. या मागणीवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला. शहरात ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी, मॅच फिक्सिंग आणि ड्रग्ज विक्रीचे जाळे संघटित पद्धतीने सुरू असल्याचा दावा समितीने निवेदनातून केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालाचा संदर्भ देत नागपूर शहरातील गुन्हेगारीच्या स्थितीबाबत समितीने चिंता व्यक्त केली. शहरातील हिंसक गुन्हे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा समितीने केला. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, शहर समन्वयक राहुल बन्सोड आदी उपस्थित होते.