भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी ( साई ) राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने गुरुवारी दिघोरी परिसरात धडक कारवाई केली. सिम्बायोसिस महाविद्यालय परिसरातील १५ घरे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केली. या कारवाईला रहिवाशांनी विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दिघोरी मौजा येथील खसरा क्रमांक-६०मधील जमीन भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी देण्यात आली आहे. या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नेहरूनगर झोनच्या सहकार्याने ही कारवाई केली. कारवाईसाठी तीन जेसीबी तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेचे पथक गुरुवारी सकाळी कारवाईसाठी दाखल होताच स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला. आपल्या घरांवर कारवाई करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली. मात्र, संबंधित जागा साईसाठी राखीव असून तेथील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या पथकाने कारवाई पुढे नेत १५ घरांचे अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने साईसाठी देण्यात आलेल्या जागेवरील उर्वरित अतिक्रमणांवरही पुढील काळात कारवाई करणण्यात येण्याची माहिती आहे.