Need For Student Congress Exchange Of Ideas And Unity
विद्यार्थी-काँग्रेस यांना जोडणारा योग्य दुवा हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(आमच्या प्रतिनिधीकडून)
नवी दिल्ली, दि. ९ :(आमच्या प्रतिनिधीकडून)
नवी दिल्ली, दि. ९ : देशाच्या निरनिराळ्या भागात चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आज येथे काँग्रेस कार्यकारिणीत अत्यंत गंभीरपणे चर्चा करण्यात आली, आणि विद्यार्थीवर्ग व काँग्रेस पक्ष यांच्यात विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी योग्य ती यंत्रणा असण्याची आवश्यकता प्रकट करण्यात आली. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी निरनिराळ्या भागांचा दौरा करावा असेही सुचवण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शांतता आणि शिस्त पाळावी याबद्दल त्यांना आवाहन करणारे एक पत्रक काढण्यात यावे, असेही ठरले. ते पत्रक तयार करण्याचे काम काँग्रेसचे महासचिव श्री. सादिक अली यांजवर सोपवण्यात आले आहे.
चर्चेत बहुतेक सर्वच सदस्यांनी भाग घेतला. एखाद्या क्षुल्लक कारणामुळे काही वेळा जातीय दंगलीपर्यंत मजल जाते, किंवा हिंसा, विध्वंस यांचे सत्र सुरू होते, असे काही नेत्यांनी सांगितले. त्यात राजकीय, जातीय पक्षांचा बराच भाग असतो, असे स्पष्ट करण्यात आले. सद्य:स्थितीत हा केवळ कायदा, सुव्यवस्था यांचा प्रश्न नव्हे, तर त्यापेक्षाही त्याचे क्षेत्र व्यापक आहे, असे एका मुख्यमंत्र्याने सांगितले. ज्या राज्यात विद्यार्थ्यांतील असंतोष, आंदोलन सर्वांत उग्र आहे, त्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीस उपस्थित नव्हते. गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी सरकार योजीत असलेल्या उपायांची माहिती दिली. विद्यापीठांबाबत सरकार फारशी आस्था दाखवीत नसल्याचे काही सदस्यांनी बोलून दाखवल्याचे कळते. काही कुलगुरूंच्या नेमणुका राजकीय हेतूंनी केल्याची टीका त्यांनी केली, असे समजते. त्यांचे म्हणणे असे की, आयएएस, आयसीएस श्रेणीतील अधिकाऱ्यांची कुलगुरुपदी नेमणूक करताना सध्याच्या उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञांकडे दुर्लक्ष होत आहे. (१० ऑक्टोबर १९६६)