स्पर्धेत टिकण्याची जबाबदारी संस्थांची

Contributed by: पंचवटी,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
स्पर्धेत टिकण्याची जबाबदारी संस्थांची
जीवनात आरोग्य, शिक्षण आदी प्रत्येक क्षेत्रात बदल करण्याची ताकद कृत्रिम प्रज्ञेमध्ये (एआय) आहे. याचा विचार करून तसे शिक्षण देणे गरजेचे आहे. सर्वत्र मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची राहणार आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, श्री बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन व स्माईल आणि स्पिनॅच संस्था यांच्यातर्फे बाळासाहेब वाघ यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. के. के. वाघ संस्थेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, ‘मविप्र’ संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी आमदार सुधीर तांबे, के. के. वाघ शिक्षण संस्था अध्यक्ष समीर वाघ, विश्वस्त शकुंतला वाघ, स्माईल आणि स्पिनॅच संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ, मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.
बाळासाहेब वाघ यांनी शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी दाखविली. केवळ वाघ शिक्षण संस्थेपुरते मर्यादित ठेवले नाहीतर त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षण संस्थेच्या असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले.

माजी मंत्री देवकर यांनी सांगितले, की बाळासाहेब वाघ हे शिक्षणाची तळमळ व जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्व होते. शासनाकडून संस्थांचे प्रश्न सोडण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळविण्यासाठी असोसिएशनची स्थापना करून कामकाजाचे नेतृत्व करून प्रश्न सोडविले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या. बाळासाहेब वाघ यांच्या कार्याचा गौरव करीत अभिवादन केले. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्यावतीने पुढील वर्षांपासून एक कृषी व दुसरा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले.