Farmers Strong Protest On Nashik Ring Road Project
रिंगरोडच्या अलाइन्मेंटवरून मोर्चा
Contributed by: नाशिक,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या अलाइनमेंटमध्ये झालेली कथित अनियमितता, शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करणे आणि सरकारच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर सिंहस्थ ध्वजारोहणाच्या दिवशी शेतकरी आत्मदहन आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रिंगरोडबाधित १५ गावांमधील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) नाशिक कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे १०० महिला शेतकरीही सहभागी झाल्या होत्या. महामंडळाचे कार्यकारी अभियंता कोळी आणि संदीप पडंगळे यांना जाब विचारताना शेतकऱ्यांच्या घरांवरून आणि जमिनींवरून रस्त्याची अलाइनमेंट का आखण्यात आली, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात कार्यवाही का होत नाही, अशी विचारणाही करण्यात आली.एका बाजूला शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची दिशाभूल करायची, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केला. प्रशासनात काम केलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अलाइनमेंटमध्ये बदल होऊ शकत असतील, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची घरे, विहिरी व बागायती जमिनी वाचवण्यासाठी बदल का केले जात नाहीत, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळविला. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची भेट घेतली.