‘स्वीकृत’ निवड पुन्हा लांबणीवर

Contributed by: नाशिक,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
nashik municipal corporation approved municipal councilor selection process now on november 4
नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी बाशिंग बांधलेले असताना, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मात्र लांबणीवर पडली आहे. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीत प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण देत ही नियुक्ती प्रक्रिया १५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर करण्याची मुदत आता ४ नोव्हेंबर असणार आहे. यापूर्वी २१ ऑक्टोबरची मुदत दिली होती.

महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या होत्या. महापालिकेतील राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यपदाचा कोटा निश्चित करण्यात आल्याने सर्वाधिक ७२ नगरसेवकसंख्या असलेल्या भाजपकडे दहापैकी ६, शिवसेने (शिंदे गटा) कडे दोन, तर विरोधी गटातील शिवसेना उबाठा-काँग्रेस गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत.
११७ जणांनी घेतले अर्ज

स्वीकृत नगरसेवकपदाच्या दहा जागांसाठी भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. स्वीकृतसाठी आतापर्यंत ११७ जणांनी अर्ज नेले आहेत. कोणत्याही कराची थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र नेण्यासाठी विविध कर विभागाकडे इच्छुकांची धावपळ सुरू आहे.