Need To Install Broken Stone Slabs Before Flag Hoisting
तुटलेल्या दगडीफरशा बसविणार कधी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तयारी करताना येथील कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, गांधी तलाव व रामकुंड यांच्यामधील जागेवर बडविण्यात आलेल्या दगडी फरशा पुराने तुटून उखडले आहेत. त्या फरशा अजूनही बसविण्यात आलेल्या नाहीत, ध्वजारोहणाच्या वेळी या जागेवर वर्दळ राहणार झल्याने त्या दगडी फरशा बसविणे गरजेचे आहे.
‘एसआयआर’प्रकरणीकाँग्रेसचे निषेध आंदोलन
पंचवटी : पंचवटी काँग्रेस ब्लॉकच्या वतीने मालेगाव स्टँड चौकात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध आंदोलन करण्यात आले. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी पंचवटी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केली. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष नीलेश खैरे, उल्हास सातभाई, लक्ष्मण धोत्रे, स्वाती जाधव, अण्णा मोरे आदी उपस्थित होते.
मंगळसूत्र खेचून
दुचाकीस्वार फरार
नाशिकरोड : अंध पतीला बस थांब्यावर पोचविण्यास गेलेल्या महिलेचा दुचाकीने पाठलाग करून तिच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वारांनी चोरून नेले. ही घटना चेहेडी शिव येथील लाला का ढाबा जवळ चेहेडी पंपिंग स्टेशन रोडवर घडली. निमिता विकास शेजवळ (रा. चेहेडी पंपिंग स्टेशन) यांनी फिर्याद दिली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेचे मंगळसूत्र
चोरांनी ओढून नेले
नाशिकरोड : बिटको महाविद्यालयामागील जगताप चौकातून महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी ओढून नेले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तमंदिर रोड, राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या शोभा विनोद नागपूरे या पायी जात होत्या. मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अकरा ग्रॅमचे साठ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
नोकरीचे आमिष;
सहा लाखांची फसवणूक
पंचवटी : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला म्हसरूळ पोलिसांनी बदलापूर पूर्व येथून अटक केली. राहुल दीपक धुळे ऊर्फ अमोल सोनवणे (वय २४, रा. जुवेली गाव, बदलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तपासात आरोपीविरोधात विविध सायबर फसवणूक प्रकरणांच्या अनुषंगाने एनसीसीआरपी पोर्टलवर ३८ तक्रारी नोंद असल्याचे समोर आले आहे.
बालाजी कोटजवळ रामझुल्यासाठी तोडकाम
पंचवटी : गोदावरीच्या पात्रावर उभारण्यात येणाऱ्या रामझुला पुलासाठी अडथळा ठरणारा बालाजी कोटाजवळील भाग काढण्याचे काम सुरू केले आहे. येथील स्वामी समर्थ केंद्राच्या जागा मोकळी करण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती.