Relatives Aggressively Protest Patients Death At District Hospital
रुग्णांचे कुटुंबीय आक्रमक
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जिल्हा रुग्णालयात कार्यरत पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या रुग्णाचा उपचाराविना मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी सोमवारी केला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या मांडून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.
विष्णू आनंद काकविपुरे यांना शनिवारी (दि. १७) सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्या यकृतात समस्या असल्यामुळे संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ते जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचले.तेथे कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला तपासण्याची तसदीही घेतली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला. रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असतानाही खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये रुग्णाला घेऊन जाण्यास नातेवाइकांना सांगण्यात आले. विष्णू यांची पत्नी त्यांना खासगी सेंटरमध्ये घेऊन गेल्या. सोनोग्राफी सेंटर पहिल्या मजल्यावर होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चालणेही अशक्य होते. तळमजल्यावरच काकविपुरे बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, मृत रुग्णाची पत्नी सोनाली काकविपुरे, सुनील ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, योगेश कांबळे, सोपान कडलग, विनोद शेळके, रवींद्र कासवे, सुजाता कदम, भारती गवळी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन आणि व्हॉट्सअ ॅपद्वारे घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली.
आंदोलन सुरू असतानाच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही तत्काळ चौकशी समिती नेमून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांची हेळसांड सुरू असताना अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणाही दोन दिवसांपासून बंद पडली आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपासून येथील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना उकाडा असह्य होत असल्याने त्यांना अन्य विभागात हलविण्याची नामुष्की जिल्हा रुग्णालय प्रशासनावर ओढावली आहे. या रुग्णांना इमर्जन्सी विभाग, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्डमध्ये दाखल करण्याची लगबग दिवसभर सुरू होती.