दिवंगत कवींचे उलगडले विश्व

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दिवंगत कवींचे उलगडले विश्व
मराठी कवितेतील भावविश्व, स्मृतींचे तरल पदर व शब्दांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव यांचा सुरेल, संवेदनशील आविष्कार नाशिककरांनी अनुभवला. निमित्त होते, ‘स्मृतींच्या काव्य वाटा’ या गायन, नृत्य व नाट्याविष्काराच्या कार्यक्रमाचे. त्यातून नाशिकमधील दिवंगत कवी-साहित्यिकांना आगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. १९) हा कार्यक्रम रंगला. ‘सावाना’च्या ५७ व्या जिल्हा साहित्य संमेलनाचा समारोप या कार्यक्रमाने झाला. कवी राजू देसले यांच्या संहितेवर आधारित या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. सदानंद जोशी यांचे निवेदन, कीर्ती भवाळकर यांचे नृत्य दिग्दर्शन, शैलेंद्र गौतम यांचे नेपथ्य, आनंद अत्रे यांचे संगीत दिग्दर्शन व संयोजन, विनोद राठोड यांची प्रकाशयोजना, तर ऋषिकेश गांगुर्डे यांचे पार्श्वसंगीत होते. कवी कुसुमाग्रजांच्या ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गायन, नाट्याविष्कार, नृत्य अशा सादरीकरणाने कार्यक्रमाने उंची गाठली.
स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी गोविंद, सोपानदेव चौधरी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, चंद्रशेखर गोऱ्हे, ना. वा. टिळक, वामनदादा कर्डक, बाबूराव बागूल, योगेश्वर अभ्यंकर, किशोर पाठक, आनंद जोर्वेकर, जयश्री पाठक, विनायक वाघमारे, शंकर बोऱ्हाडे, अरुण काळे, कमलाकर देसले, कैलास पगारे, गौरवकुमार आठवले, प्रियंका डहाळे, सतीश पिंपळगावकर, विठ्ठल शिंदे, राम पाठक, शरद देशमुख, भीमराव कोते, विलास पगार व पंढरीनाथ सोनवणी यांच्या साहित्यविश्वाचा यावेळी वेध घेण्यात आला.

केतन पटवर्धन, आशुतोष सूर्यवंशी, श्रावणी गिते, प्राजक्ता अत्रे-गोसावी, मीना परुळकर-निकम यांनी गायन केले. रागेश्री धुमाळ, सुधीर सोनवणे, हितेश्वर पाटील, आकाश बैरागी व चैतन्य पाळेकर यांनी साथसंगत केली. कीर्ती भवाळकर, अनुष्का गोखले, अद्विका महाजन, वसुंधरा आहेर, रिया भावसार, तेजल मांडवकर, नूपूर ऐनापुरे यांचे नृत्य सादरीकरण झाले. राहुल काटे यांनी लावणीनृत्य सादर करीत दाद घेतली. हेमंत महाजन, किरण राव, राजेंद्र उगले, राम वाणी, श्रद्धा पाटील, सोनल मिरजकर, सुनीता वाघमारे, चंद्रवदन दीक्षित, मधुरा तरटे, रचना चिंतावार, राजेंद्र चिंतावार, दिशा जोशी, सनी धात्रक, वैभव बोराडे व अरुण इंगळे हे कलावंतही सादरीकरणात सहभागी झाले होते.