Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रिझर्व्ह बँकेकडून आठ वर्षांपूर्वी २३ ऑक्टोबरला वितरित करण्यात आलेल्या सार्वभौम सुवर्णरोख्यांची (एसजीबी) शुक्रवारी मुदतपूर्ती झाली. या मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदारांना पैसे परते घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना या परताव्याच्या रूपाने गुंतवलेल्या रकमेवर ३६६ टक्के अधिक रक्कम मिळणार आहे. ही रक्कम गुंतवणूकदारांच्या ‘डीमॅट’ खात्यात किंवा बँक खात्यात थेट जमा होईल.
सार्वभौम सुवर्णरोखे २०१८ मालिका-२ ची मुदत आठ वर्षांची आहे. मात्र, कुणाला मध्येच रक्कम काढून घ्यायची असेल, तर ती हे रोखे खरेदी केल्यापासून पाचव्या वर्षी काढून घेण्याची मुभा देण्यात आली होती. या तारखेपर्यंतचे व्याज दिले जाईल, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. रिझर्व्ह बँक सार्वभौम सुवर्णरोखे मालिकेच्या मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदाराला रक्कम परत देताना सोन्याचा भाव हा ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या (इब्जा) ९९९ शुद्धतेच्या जाहीर केलेल्या सोन्याच्या भावानुसार ठरवते. हा भाव रोखे रक्कम परत करण्याच्या तारखेच्या आधीच्या तीन दिवसांतील सोन्याच्या भावाची सरासरी या स्वरूपात निर्धारित केला जातो.
शुक्रवारी मुदतपूर्ती झालेल्या या सुवर्णरोख्यांवर नेमका किती परतावा मिळाला हे मोजल्यास तो खरेदीच्या वेळी असलेला प्रतिग्रॅम ३,०९६ रुपये हा भाव वजा केल्यास ११,३२९ रुपये अधिक मिळणार आहेत. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याला ४.६६ लाख रुपये प्राप्त होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या सार्वभौम सुवर्णरोख्यांवर वार्षिक २.५० टक्के व्याजही दिले जाते. व्याजाचा हा दर कायम असतो. आठ वर्षे या मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही भांडवली लाभ कर लागणार नाही, असे एका बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.