Massive Poster Campaign Against Samajwadi Party In Uttar Pradesh
समाजवादी पक्षाविरोधात जोरदार फलकबाजी
Contributed by: बलिया|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि अन्य नेत्यांना लक्ष्य करणारे फलक शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांत झळकले. या फलकांमध्ये पक्षाला ‘जातीयवादी’ आणि ‘माफियांचा पक्ष’ म्हटले आहे. अखिलेश यादव यांचा जाळीच्या टोपीतील फोटो; तसेच मृत गँगस्टर अतीक अहमद आणि तुरुंगात असलेले नेते आझम खान यांची छायाचित्रे त्यावर होती.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही फलक आणि बॅनर फाडून टाकले. भाजपने मतदानाच्या दिवशी वातावरण बिघडवण्याचा आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाच्या युवा जनसभेचे राज्याध्यक्ष अरविंद गिरी यांनी सांगितले, की पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आशुतोष सिन्हा आणि शिक्षक मतदारसंघातील लालबिहारी यादव विजयी होतील. पराभवाच्या भीतीने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघांतील ११ जागांसाठी सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले. बलियातील एका फलकावर अखिलेश यादव यांच्यासोबत २०२३मध्ये ठार झालेल्या अतीक अहमद, २०२४ मध्ये मृत्यू झालेला मुख्तार अन्सारी आणि आझम खान यांची छायाचित्रे होती. अन्य फलकांवर यादव कुटुंब आणि पक्षाच्या ‘कुटुंबकेंद्री’ राजकारणावर निशाणा साधण्यात आला होता.
‘सप’च्या नेत्यांनी भाजपवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून प्रचार केल्याचा आरोप केला. यापूर्वीही दोन्ही पक्षांमध्ये फलकबाजी सुरू होती. काही फलकांमध्ये अखिलेश यादव, राहुल गांधी आणि उद्योगपती इलॉन मस्क यांना रावणाच्या दहा डोक्यांमध्ये दाखवून ‘सनातन भारताचे शत्रू’ असे म्हटले होते.