दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ

Contributed by: वृत्तसंस्था,इस्लामाबाद|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ
भारतावर पुन्हा चिखलफेक

पेशावर येथे अशांतता
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शुक्रवारी दहशतवादी संघटनांच्या विरोधातील मोहीम सुरूच राहील, असे स्पष्ट केले अशा संघटनांना जिथे असतील तिथे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुनीर यांनी पेशावर येथील लष्कराच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना सुरक्षा स्थिती, सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाया, सीमाव्यवस्थापनाच्या उपाययोजना आणि खैबर पख्तुनख्वा येथे तैनात दलांची कार्यसज्जता याबाबत माहिती देण्यात आली, असे पाकिस्तानी लष्कराने निवेदनात म्हटले आहे.

या वेळी फील्ड मार्शल मुनीर यांनी अधिकारी आणि जवानांचे उच्च मनोबल; तसेच व्यावसायिकतेचे कौतुक केले. संभाव्य धोक्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी दक्षता आणि सर्वोच्च दर्जाची कार्यसज्जता कायम ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भारतावर पुन्हा चिखलफेक

‘भारतपुरस्कृत दहशतवादी संघटनांविरोधातील मोहीम आम्ही पूर्ण ताकदीने सुरू ठेवू आणि त्या जिथे असतील तिथे त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ,’ असे मुनीर यांनी निवेदनानुसार म्हटले आहे.

दरम्यान, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांतील दहशतवादी संघटनांना भारताचा पाठिंबा असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने यापूर्वी फेटाळला आहे.

पेशावर येथे अशांतता

खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावर येथे गेल्या काही महिन्यांत वारंवार दहशतवाद ी हल्ले झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये सरकारने या अशांत प्रांतात आणीबाणी आणि राज्यपाल राजवट लागू केली होती. दहशतवाद रोखण्यात प्रांतिक सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही सरकारने केला होता. मात्र, आणीबाणीनंतरही येथे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे सरकार त्रस्त आहे.

नवी दिल्ली : खैबर पख्तुनख्वा येथे आणीबाणी आणि राज्यपाल राजवट लागू करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणावरून योग्य ठरवला होता. मात्र, हा निर्णय आता सरकारवरच उलटत असल्याचे दिसत आहे. या निर्णयानंतरही खैबर पख्तुनख्वामधील हल्ले सुरूच आहेत. उलट, सत्तास्थापनेला आव्हान देणाऱ्या गटांनी आपल्या कारवाया अधिक तीव्र करण्याचा आणि या भागात आणखी घातक हल्ले करण्याचा इशारा दिला आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) हे सरकारसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. भारतीय गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात चिनी कामगारांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवरही ताण आला आहे.