Revolutionizing Cloud Computing The Inspiring Story Of Marc Benioff
क्लाउड कम्प्युटिंग क्रांतीचा प्रणेता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
र्क बेनिऑफ हे जागतिक आयटी क्षेत्रातील एक आघाडीचे नाव असून, ते प्रसिद्ध अमेरिकी सॉफ्टवेअर कंपनी ‘ सेल्सफोर्स ’चे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ आहेत. क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
आजच्या डिजिटल युगात व्यवसायांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. ग्राहकांशी संवाद साधणे, विक्रीचे व्यवस्थापन करणे आणि व्यावसायिक माहितीचे विश्लेषण करणे यांसाठी कंपन्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. या परिवर्तनात बेनिऑफ यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.बेनिऑफ यांचा जन्म २५ सप्टेंबर १९६४ रोजी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे झाला. त्यांना बालपणापासूनच कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाची आवड होती. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी लिबर्टी सॉफ्टवेअर नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली आणि तिच्या माध्यमातून कम्प्युटरसाठी व्हिडिओ गेम्स बनवले. त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’मधून बँकिंग अँडबिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेनिऑफ यांनी १९८६मध्ये प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ‘ओरॅकल कॉर्पोरेशन’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी विक्री, मार्केटिंग आणि उत्पादन विकास क्षेत्रात महत्त्वाची पदे भूषवली. ‘ओरॅकल’चे संस्थापक लॅरी एलिसन यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जात. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ते कंपनीचे सर्वांत तरुण उपाध्यक्ष बनले.
‘ओरॅकल’मध्ये १३ वर्षे काम केल्यानंतर, १९९९ मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात एका नव्या आणि क्रांतिकारी कल्पनेवर काम करण्याचे ठरवले. त्या वेळी कंपन्यांना सॉफ्टवेअर सीडी किंवा हार्डवेअरच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये ‘इन्स्टॉल’ करावे लागायचे. ते खरेदी करण्यासाठी मोठा खर्च होत असे; शिवाय त्याची स्थापना, देखभाल आणि अद्ययावतीकरण यासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक होती.
बेनिऑफ यांनी ही पद्धत बदलून ‘क्लाउड कम्प्युटिंग’ची संकल्पना राबवली. या मॉडेलमध्ये ग्राहकांना स्वतःच्या कम्प्युटरवर सॉफ्टवेअर बसवण्याची गरज नव्हती. इंटरनेटच्या साह्याने ते आवश्यक सेवा वापरू शकत होते. सॉफ्टवेअर कम्प्युटरवर स्वतंत्रपणे स्थापित करण्याऐवजी इंटरनेटच्या माध्यमातून ‘ सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस ’ म्हणून उपलब्ध करून दिले, तर ग्राहकांचा खर्च कमी होऊ शकतो आणि सेवा वापरणेही सोपे होऊ शकते, ही कल्पना त्यांनी मांडली.
याच विचारातून त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ‘सेल्सफोर्स’ या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला अनेकांनी या संकल्पनेवर शंका घेतली; परंतु बेनिऑफ यांनी दूरदृष्टी दाखवत ग्राहकसंबंध व्यवस्थापन अर्थात ‘कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट’ या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले. ग्राहकांची माहिती, विक्रीच्या संधी,मार्केटिंग मोहिमा आणि ग्राहकसेवा यांचे व्यवस्थापन एकाच डिजिटल व्यासपीठावर करण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली.
या सेवेमुळे कंपन्यांना ग्राहकांशी अधिकप्रभावीपणे संवाद साधता येऊ लागला. व्यवसायातील माहितीचे विश्लेषण करणे आणि विक्रीच्या प्रक्रियेत सुधारणा करणेही शक्य झाले. क्लाउडवर आधारित सॉफ्टवेअर सेवा लोकप्रिय होण्याच्या प्रक्रियेत ‘सेल्सफोर्स’ने महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज जगभरातील लाखो कंपन्या आपल्या व्यवसायासाठी ‘सेल्सफोर्स’च्या क्लाउड प्लॅटफॉर्मचा वापर करतात. २००१मध्ये बेनिऑफ यांनी कंपनीचे सीईओ म्हणून जबाबदारी स्वीकारली.