पॅरिसहून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ताब्यात घेऊन ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा दावा आम आदमी पक्षाने (आप) केल्यानंतर, शुक्रवारी मान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘हा सूड उगवण्याचा प्रकार आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
दिल्ली विमानतळावर आपल्याला दोन तास बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप मान यांनी केला; तसेच, दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क विभागाचे प्रमुख हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे बंधू असल्याचा दावाही त्यांनी केला.पंजाब विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अधिकृत ठरावावरील चर्चेत सहभागी होताना मान म्हणाले, की फ्रान्सहून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आपल्याला बाजूला नेऊन दोन तास बसवून ठेवले.
‘ते म्हणाले की सामानाची तपासणी करायची आहे. मात्र, काहीही आढळले नाही, तेव्हा त्यांनी मला जाण्यास सांगितले,’ असे मान म्हणाले. ‘मी माझ्या शिष्टमंडळासह विमानतळावरून बाहेर पडत असताना अधिकाऱ्यांनी ‘वरून प्रचंड दबाव आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला ५० हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले,’ असे मान यांनी सांगितले.
‘दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क विभागाचे प्रमुख मनीष असून, ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे बंधू आहेत. अशा प्रकारे सूड उगवला जातो,’ असा आरोप मान यांनी केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कामकाजात कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारा अधिकृत ठराव पंजाब विधानसभेने शुक्रवारी मंजूर केला.