Sebi Eases Call Recording Rules Opportunity For Companies To Simplify Business
कॉल रेकॉर्डिंग नियम ‘सेबी’कडून शिथिल
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बाजार नियामक ‘ सेबी ’ने शुक्रवारी संशोधन विश्लेषकांना संस्थात्मक गुंतवणूकदारांशी झालेल्या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग ठेवण्याची अनिवार्य अट शिथिल केली असून, यामुळे नोंदणी ठेवण्याचे वाढीव काम कमी होईल आणि व्यवसायसुलभता वाढेल, असे वित्त सल्लागारांचे मत आहे. ही सुधारणा आठ नोव्हेंबरपासून लागू होईल.
संशोधन विश्लेषक आणि संस्थांना यापुढे संस्थात्मक गुंतवणूकदारांशी झालेल्या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग ठेवणे अनिवार्य राहणार नाही; तथापि, स्वाक्षरी केलेल्या भौतिक नोंदी, ई-मेल, एसएमएस संदेश, कॉल रेकॉर्डिंग किंवा कायदेशीररीत्या पडताळणीयोग्य अशा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे संभाव्य ग्राहकांसह सर्व ग्राहकांशी झालेल्या संवादाच्या नोंदी ठेवणे त्यांना यापुढेही आवश्यक राहील, असे ‘सेबी’च्या पत्रकात नमूद आहे.या नोंदी पाच वर्षे ठेवणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये वाद उपस्थित झाला आहे, अशा प्रकरणांत तो निकाली निघेपर्यंत नोंदी जतन कराव्या लागतील; तसेच विशिष्ट नोंदी जतन करण्याचे निर्देश सेबीने दिल्यास त्या नोंदीही ठेवाव्या लागतील.
नियामकाने स्पष्ट केले, की ई-मेलसारख्या माध्यमांतून ग्राहकांशी संवाद होतो जिथे डिजिटल पाऊलखूण उपलब्ध असते, तेथे कॉल रेकॉर्डिंग आवश्यक नाही. ‘संशोधन विश्लेषकाने (आरए) संभाव्य ग्राहकांसह सर्व ग्राहकांशी झालेल्या संवादाच्या नोंदी ठेवाव्यात,’ असे सेबीने म्हटले आहे.