चर्चमध्ये गोळीबार; सात ठार, ३४ जखमी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
shooting in jordan church 7 dead 34 injured
जेरुसलेम : जॉर्डनमध्ये शुक्रवारी अंत्यसंस्कार सुरू असताना एका चर्चमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले, तर ३४ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राजधानी अम्मानपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या कराक शहरातील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये हा गोळीबार झाला. जॉर्डनच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आलेल्या दृश्यांमध्ये दोन बंदूकधारी पिस्तूल हातात घेऊन चर्चजवळ येताना आणि गोळीबार करताना दिसत आहेत. त्यानंतर अर्धस्वयंचलित रायफल हातात घेतलेला तिसरा हल्लेखोर घटनास्थळी येऊन गोळीबार करताना दिसतो. हल्ला अज्ञात हल्लेखोरांनी केल्याचे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

घरातील फटाक्यांच्या स्फोटात तिघांचा मृत्यू
सिवान (बिहार) : बिहारच्या सिवान जिल्ह्यात फटाके साठवून ठेवलेल्या घरात शुक्रवारी स्फोट होऊन किमान तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. सिवानचे जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीना यांनी ‘पीटीआय’ला सांगितले, की जोमो भागात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या घटनेची संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांना जबाब नोंदवण्याचा आदेश

मियामी : ‘बीबीसी’विरुद्ध दाखल केलेल्या १० अब्ज डॉलरच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ११ डिसेंबरपर्यंत जबाब नोंदवावा, असा आदेश न्यायाधीशांनी गुरुवारी दिला. अमेरिकी मॅजिस्ट्रेट न्यायाधीश एन्जोलिक लेट यांनी हा आदेश दिला. ब्रिटिश प्रसारवाहिनी ‘बीबीसी’च्या वकिलांनी, स्वतःच्या दाव्यातच ट्रम्प यांनी जबाब नोंदवण्यास विलंब केल्याची तक्रार न्यायालयात केली होती.