इराणवर आणखी लष्करी कारवाई?

Contributed by: वॉशिंग्टन,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
इराणवर आणखी लष्करी कारवाई?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आणखी लष्करी कारवाई होण्याची शक्यता कायम असल्याचे स्पष्ट करून, आगामी काँग्रेस निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला या युद्धाची राजकीय किंमत मोजावी लागू शकते अशी कबुली दिली आहे. वॉशिंग्टनमधून रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मोहिमेचे समर्थन केले. अमेरिकी नागरिकांमध्ये या निर्णयावरून मतभेद असले, तरी इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी ही पाऊले उचलणे अत्यावश्यक होते, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी कोणतीही नवीन मोहीम, संभाव्य लक्ष्ये अथवा निश्चित वेळापत्रक जाहीर केले नाही. मात्र, आम्ही इराणचा मोठा विध्वंस केला असून, गरज पडल्यास आणखी कारवाई करू, असे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यासोबत कोणतेही अधिकृत लष्करी स्पष्टीकरण वा आकडेवारी देण्यात आलेली नव्हती. इतर राष्ट्राध्यक्षांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते आपण केले असून, देशप्रेमी नागरिक आपल्या पाठीशी उभे आहेत, असा दावा त्यांनी केला. याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे भवितव्य समर्थकांच्या मतदानावर अवलंबून असल्याचे सांगून, त्यांनी या युद्धाचा संबंध थेट देशांतर्गत राजकारणाशी जोडला.
दुसरीकडे, न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी युद्धाच्या मुद्द्यावरून इशारा दिला. ‘युद्धाची व्याप्ती वाढल्याने ऊर्जा बाजारपेठ, वाहतूक मार्ग, पुरवठा साखळी आणि वित्तीय यंत्रणेवर विपरीत परिणाम होत असून, सामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे,’ असे गुटेरस म्हणाले. युद्ध थांबवण्याचे व मुत्सद्देगिरीला संधी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. गुटेरस इजिप्त दौऱ्यावर जाणार असून, अमेरिका आणि इराणमधील संघर्षात इजिप्त मध्यस्थीची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी दिल्ली : इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी नवी दिल्लीतील ‘एनडीटीव्ही वर्ल्ड समिट’मध्ये बोलताना, अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी मिनाब येथील ‘शजरेह तय्यिबा’ प्राथमिक शाळेवर केलेल्या हल्ल्याबद्दल अद्याप माफी मागितलेली नाही, असा आरोप केला. या हल्ल्यात निरपराध मुलांचा मृत्यू झाला असून, काहींचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा निषेध करावे, असे आवाहनही इलाही यांनी केले. सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांची प्रकृती उत्तम असून, ते सक्रियपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले