कपाशी आणि तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली. वणी तालुक्यातील सैदाबाद येथील शेतात छापा टाकून पोलिसांनी गांजाची १२७ झाडे जप्त केली. या कारवाईत एकूण १८ किलो ५८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांना सैदाबाद येथील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. सुखदेव लेतू आत्राम (वय ५०) याने आपल्या शेतात कपाशी आणि तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी छापा टाकला.