‘ मनोज जरांगे यांनी ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरून ऐकविलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्यात येईल; मात्र हे संभाषण अडीच वर्षांनंतरच बाहेर येण्यामागचा नेमका हेतू काय आणि यातून कुणाला लक्ष्य केले जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. फॉरेन्सिक तपासणीतून या प्रकरणातील सत्य समोर येईल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणावर भूमिका मांडली. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनोज जरांगे यांनीही केली आहे. ‘शिवसेनेचे प्रतिनिधी गुरुवारी आपल्याला भेटले होते. त्यांनाही या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपची आणि त्यातील संभाषणाची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल. त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल,’ असेही त्यांनी नमूद केले. मात्र, इतक्या कालावधीनंतर हे संभाषण समोर आणण्यामागे काय हेतू आहे आणि त्यातून नेमके कोणाला लक्ष्य केले जात आहे, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.पदवीधर निवडणुकीत मतदारांचा उत्साह दिसून येत असल्याचे ते म्हणाले. ‘विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह असल्याने या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे. सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. लोकशाहीच्या दृष्टीने हे चित्र अपेक्षित असून, निवडणुकीत योग्य निकाल लागेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानासाठी स्पायपेनचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात विचारले असता, ‘स्पायपेन म्हणजे नेमके काय, हे सुप्रिया सुळे यांनी मला सांगावे. तो पेन नेमका कसा असतो, हे मी समजून घेईन,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
संबंधित वृत्त... ६
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा शब्द दिल्यानंतर शुक्रवारी तातडीने गृह विभागाने एसआयटी नेमण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे खात्रिलायकरीत्या समजते.