Fourth Mpsc Officer Arrested Action By Crime Branch In Paper Leak Case
एमपीएससीचा चौथा अधिकारी अटकेत
Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनातील निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात, मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. रोहित कोलटक्के असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, तो एमपीएससीमध्ये सहायक कक्ष अधिकारी आहे. प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली होती. मात्र, परीक्षेपूर्वी काही दिवस प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणात यापूर्वी ‘ एमपीएससी ’चे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली होती. तसेच, प्रश्नसंच मिळाल्याचा आरोप असलेल्या उमेदवार ऋतुजा पाटील, साजिद संदे, विजय किंगर, संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांनाही अटक करण्यात आली. फरारी मध्यस्थ मयूर ठाकरे यालाही पकडले होते.त्यांच्या चौकशीत सहायक कक्ष अधिकारी कोलटक्केचे नाव समोर आले. त्याने लेंडवे याच्याकडून दीड ते दोन लाख रुपये देऊन प्रश्नसंच मिळविल्याचा आरोप आहे. कोलटक्के याला नवी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.