‘हिट अँड रन’मध्ये ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, एक गंभीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बेला परिसरात भरधाव कारने मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला ३१ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उल्हास धाडू कोलाटकर रा. भंडारा हे आपले सहकारी शुभम आनंद बावणे (३१) यांच्यासोबत एमएच ३६-व्ही ५११५ क्रमांकाच्या मोपेडने हिवरा येथे दसरा पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून दोघेही मोपेडने भंडाऱ्याकडे परत येत होते. बेला परिसरातून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेत कोलाटकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बावणे गंभीर जखमी झाले.