पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळूनही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. बँका आणि सेवा सहकारी संस्थांच्या या अडवणुकीच्या व उदासीन भूमिकेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्जवाटपात टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ६०० सेवा सहकारी संस्थांना सहाय्यक निबंधकांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. टाळाटाळ करणाऱ्या संचालक मंडळांवर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सेवा सहकारी संस्था या थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. तरीही कर्जमुक्त पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पतपुरवठा करण्यास अनेक संस्थांकडून आखडता हात घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर, सहकार विभागाच्या आदेशानुसार ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ज्या संस्था अपेक्षित कामगिरी करणार नाहीत, त्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन दोषी आढळल्यास संबंधित संचालक मंडळावर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक निबंधकांना देण्यात आले आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी सभासदांनी कोणतीही दिरंगाई न करता, संबंधित बँक शाखा किंवा सेवा संस्थेशी संपर्क साधून नव्या पीक कर्जासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.राष्ट्रीयकृत बँकांनाही दम
फक्त जिल्हा बँकच नव्हे, तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनीही कर्जवाटपाचा संथ कारभार सोडून दिलेले लक्ष्यांक पूर्ण करावे, असे बजावण्यात आले आहे. आगामी शेती हंगामाचे वेळेत नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती खेळते भांडवल असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासन, बँका आणि सहकार क्षेत्राने आपापसातील समन्वयातून ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी, अशी ताकीद देण्यात आली आहे.
आजच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पात्र असूनही कर्ज देताना हयगय करण्याऱ्या बँका आणि सोसायट्यांच्या धोरणावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ कागदी घोडे न नाचवता पीक कर्जवाटपाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
बुलढाणा : यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. पाऊस नसल्याने सोयाबीन चांगले आले नाही. त्यातच बँकेचे घेतलेले कर्ज आई, वडिलांना फेडणे जड झाले. गरिबी जगू देत नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या एका शेतकरीपुत्राने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे ही घटना उघडकीस आली. सचिन ज्ञानेश्वर भिनये (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंत्री खेडेकर येथील सुनीता ज्ञानेश्वर भिनये यांच्या नावाने मेरा बुद्रूक शिवारात दीड एकर कोरडवाहू शेती आहे. त्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेरा शाखेकडून ५० हजारांचे कर्ज उचलण्यात आले होते.