कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बस, शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली व लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी प्रासंगिक करार करून घेतल्या जाणाऱ्या बसचा प्रवास २० ते २५ टक्क्यांनी महागला आहे.
गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ, डिझेल, टायर व सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ, टोल व सरकारी शुल्कात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन’तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसची शुल्कवाढही परिवहन विभागाकडे प्रस्तावित असून ती पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलात येईल.असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी ही माहिती दिली. उपाध्यक्ष सुनील मोरे, सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनावणे, किरण देसाई, सचिन पंचमुख आदी उपस्थित होते.
‘मागील पाच वर्षांत बस वाहतूक दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, या कालावधीत वाहनांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. टायर्स, सुटे भाग, देखभाल-दुरुस्ती, चालकांचे वेतन व भत्ते, विमा, इंधन; तसेच विविध शासकीय नियम व तांत्रिक बाबींशी संबंधित खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य आहे,’ असे जुनवणे म्हणाले. यात प्रामुख्याने १३ सीटर ते ४९ सीटर बस, स्कूल बस, स्टाफ बस व टुरिस्ट बसचा समावेश आहे. दरवाढ करूनही आमचे दर ‘एसटी’पेक्षा ३० टक्के कमी आहेत,’ असेही जुनवणे म्हणाले.
‘परिवहन मंत्र्यांचे एसटी महामंडळाकडेच लक्ष असून, बाकीच्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्षच होत आहे. राज्य परमिट, शहर परमिट, टोलसह विविध प्रकारचे कर, दंड, वाहनतळ हे खर्च दिवसेंदिवस वाढत असून, सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. सक्तीच्या सुरक्षा उपकरणांचा भुर्दंडही आम्हालाच सहन करावा लागतो,’ असे देसाई म्हणाले.‘सरकारने समिती स्थापन करून खासगी वाहनांसाठी रिक्षाप्रमाणे दरपत्रक निश्चित करावे,’ अशी मागणी जगताप यांनी केली.