प्रतिकाचे शतक; भारताची सरशी

Contributed by: बडोदा,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
प्रतिकाचे शतक; भारताची सरशी
प्रतिका रावलचे शतक आणि शेफाली वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिलांच्या वन-डे क्रिकेट मालिकेत झिम्बाब्वेचा नऊ विकेटनी सहज पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला नाही. श्री चरणी आणि क्रांती गौड यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा डाव १९७ धावांतच रोखला. प्रत्युत्तर देताना भारताने धडाक्यात सुरुवात केली. प्रतिका आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी पॉवरप्ले अर्थात पहिल्या दहा षटकांत ७२ धावा केल्या होत्या. प्रतिका-स्मृती यांनी ९३ चेंडूंत ९४ थावांची सलामी दिली. स्मृती परतल्यानंतर प्रतिका आणि शेफाली यांनी भारताला २८व्या षटकात विजय मिळवून दिला. प्रतिकाला ४५ धावांवर जीवदान मिळाले होते. तेराव्या षटकात फिरीच्या गोलंदाजीवर सिबांदाने मिडविकेटला तिचा झेल सोडला होता. त्याचा फटका झिम्बाब्वेला बसला. या संधीचे सोने करून प्रतिकाने शतक साजरे केले. प्रतिका-शेफाली यांनी ७० चेंडूंत १०६ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे - सर्व बाद १९७ (मोडस्टर मुपाचिक्वा २५, बिलव्हड् बिझा ६२-९२ चेंडूंत ५ चौकार, मावुंगा २९-२३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार, क्रांती गौड १०-१-४२-३, सायली सातघरे ७-०-३३-०, श्री चरणी १०-३-२३-४, दीप्ती शर्मा ९.५-१-४४-२) पराभूत वि. भारत - २७.१ षटकांत १ बाद २०० ( प्रतिका रावल नाबाद १००-९६ चेंडूंत १५ चौकार, स्मृती मानधना ३२-३४ चेंडूंत ४ चौकार, शेफाली वर्मा नाबाद ६४-३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार).