‘एसआयआर’ आंदोलनाची धग कायम

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘एसआयआर’ आंदोलनाची धग कायम
सुरक्षा दले आठवडाभर दिल्लीत

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रियेविरोधात (एसआयआर) नवी दिल्लीत शुक्रवारी पुन्हा एकदा आंदोलन झाले. डाव्या पक्षांच्या ‘पीपल्स अगेन्स्ट एसआयआर’ या मोहिमेंतर्गत डाव्या विचारसरणीचे पक्ष, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.
तिरंगा हाती घेतलेल्या शेकडो आंदोलकांनी गुरुद्वारा बंगला साहिब आणि गोल डाकखाना परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. हजारो सशस्त्र जवान आणि दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचा हा प्रयत्न रोखला. आयोजकांच्या दाव्यानुसार ८८ शहरांमध्ये १४५ संघटनांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे.

दास आणि रांका हजर

कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर एका वेगळ्या चौकशीसाठी हजर झाले. जंतर मंतरवरील पक्षाच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. सीजेपीचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी चौकशीला उपस्थित राहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सुरक्षा दले आठवडाभर दिल्लीत

दिल्लीमध्ये विविध संघटनांकडून यापुढेही आंदोलने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या २७३ कंपन्यांची तैनाती पुढील शनिवार, ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. इंडिया आघाडी, सीजेपी आणि अन्य संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दलांना दिल्लीमध्ये तैनात करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस आणि संबंधित केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांना त्यांच्या जवानांच्या तैनातीसाठी परस्पर समन्वय साधण्याचे निर्देश दिले.