अंबरनाथमध्ये लाखोंचे हेरॉइन जप्त

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,अंबरनाथ|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
large quantity of heroin seized in ambernath arrests made of accused and minor suspect
अंबरनाथ पश्चिमेतील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत १३.०२ ग्रॅम हेरॉइन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी उमा चित्रे ह अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील सिद्धार्थनगर परिसरात एक महिला संशयास्पद वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अर्चना कटके यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पानसरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत महिलेची झडती घेतली. यावेळी तिच्याकडे १३.०२ ग्रॅम हेरॉइन आढळून आले. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून चित्रे हिला अटक केली. न्यायालयाने तिला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याच प्रकरणात एका अल्पवयीन संशयितालाही ताब्यात घेण्यात आले असून, बाल न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.