नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशांतर्गत हवाई मार्गांचा विस्तार करून आणखी नऊ ठिकाणांचा समावेश केला आहे. अगत्ती, दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, बागडोगरा, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या ठिकाणांशी आता विमानतळाची जोडणी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना देशातील विविध शहरांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नव्या मार्गांमुळे महाराष्ट्रासह राजस्थान, बिहार, आसाम, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील शहरांशी हवाई संपर्क वाढणार आहे. अगत्तीला गोवा-मोपा मार्गे जोडण्यात आले आहे. जळगाव आणि सिंधुदुर्ग या मार्गांमुळे राज्यातील प्रवासासाठीही नवे पर्याय उपलब्ध होतील. या विस्तारामुळे विमानतळाच्या देशांतर्गत हवाई जाळ्यात महत्त्वाची भर पडली आहे.आतापर्यंत ३५.८८ लाख प्रवासी
विमानतळाचे कामकाज सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ लाख ८८ हजार ६७५ प्रवाशांनी येथून प्रवास केला आहे. यामध्ये ३५ लाख ८० हजार २३३ देशांतर्गत, तर आठ हजार ४४२ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. एकूण प्रवाशांपैकी १८ लाख एक हजार ३७७ प्रवाशांनी विमानतळावरून प्रस्थान केले, तर १७ लाख ८७ हजार २९८ प्रवाशांचे आगमन झाले. या काळात विमानतळावर २७ हजार १८५ नियोजित विमान हालचालींची नोंद झाली. त्यापैकी २७ हजार १११ देशांतर्गत, तर ७४ आंतरराष्ट्रीय विमान हालचाली होत्या. याशिवाय मालवाहू विमानांच्या ४९३ आणि सामान्य विमान वाहतुकीच्या ९६१ हालचाली नोंदवण्यात आल्या.
४५ ठिकाणांशी मालवाहतूक जोडणी
प्रवासी वाहतुकीबरोबरच विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतूकही वाढत आहे. मालवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १८ विमान कंपन्यांच्या माध्यमातून ४५ ठिकाणांशी जोडणी झाली आहे. या कंपन्यांमध्ये एमिरेट्स, कतार एअरवेज, लुफ्थांसा, एअर फ्रान्स, टर्किश एअरलाइन्स यांच्यासह एअरलॉजिक, अ ॅटलस एअर आणि डीएचएलचा समावेश आहे. या सेवांमुळे युरोप, मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील विविध ठिकाणांशी मालवाहतूक करणे शक्य होत आहे. देशांतर्गत मार्गांमध्ये झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामकाजाचा व्याप वाढत आहे.