पंकज अडवानीला २९वे जगज्जेतेपद

Contributed by: बर्मिंगहॅम,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
pankaj advanis 29th world championship is a historic victory
भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवानीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पंकजने डब्ल्यूबीएल जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील एकूण २९वे जगज्जेतेपद ठरले.

कस पाहणाऱ्या पाच तासांच्या अंतिम लढतीत ४१ वर्षीय पंकजने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलला १९०६-१२०६ असे पराभूत केले. २०१४मध्ये हे दोघे आमनेसामने आले होते. त्यात पंकजनेच बाजी मारली होती. त्यानंतर या टाइम्ड फॉरमॅटमध्ये पंकजने प्रथमच बाजी मारली. पाच वेळा जगज्जेतेपदाच्या अंतिम लढत स्थान मिळवणारया हॉलला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या सामन्यात ११५ मिनिटे शिल्लक होती, तेव्हा हॉलकडे १०१४-६९७ अशी आघाडी होती. तेव्हा हॉल आपले पहिले जागतिक विजेतेपद जिंकण्याच्या उंबरठ्यावर दिसत होता. मात्र, पंकजने हार मानली नाही. त्याने २१० गुणांचा ब्रेक नोंदवून हॉलची आघाडी कमी केली आणि आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच हॉलने एक सोपा शॉट मिस केला आणि पंकजला संधी मिळाली. या संधीचे सोने करून पंकजने या संपूर्ण चॅम्पियनशिपमधील सर्वांत संस्मरणीय खेळ दाखवला. त्याने ५८७ गुणांचा मोठा ब्रेक नोंदवला, जो या संपूर्ण वर्षातील सर्वोच्च ब्रेक ठरला. यासह त्याने आणखी एका संस्मरणीय जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.