पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत दिवाळीपूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘ महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटने’ने केली आहे. मागण्यांवर निर्णय न झाल्यास पाच नोव्हेंबरपासून पुण्यासह राज्यभरातील विभागीय कार्यालये आणि एसटी आगारांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यापूर्वी तीन नोव्हेंबरला घंटानाद व निदर्शने; तर चार नोव्हेंबरला द्वारसभा घेण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ हजार रुपये भेट आणि १२ हजार ५०० रुपये सणउचल द्यावी; तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन दोन नोव्हेंबर रोजी अदा करावे, या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता ६० टक्के करावा आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, अशीही मागणी आहे. मागण्यांबाबत महामंडळ आणि सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेचे विभागीय कार्यालय सचिव सागर दिघे यांनी व्यक्त केली.