जुन्या वादातून उद्भवलेल्या वैमनस्यातून आर्वी शहरातील २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अभिजित अवधूत ढोकणे (वय २१), रा. पिंपरी पुनर्वसन (आर्वी) असे मृताचे नाव आहे. धारदार चाकू आणि लोखंडी पाइपने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
ढोकणे हा भाजीपालाविक्री आणि ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. जुन्या तहसील कार्यालयाजवळ त्याचे भाजीपाल्याचे दुकान होते. काही कारणातून अभिजित आणि सुभाष हायगले यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेच्या आदल्या दिवशी, २१ ऑक्टोबर रोजी आर्वी बसस्थानक परिसरातही दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले. जेवण केल्यानंतर अभिजित पुन्हा दुकानावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात विशाल अरुण निपाने (वय ३८), प्रथमेश सुभाष हायगले (वय अंदाजे २५) आणि सुभाष देवबाआप्पा हायगले (वय ५२) तिघेही रा. आर्वी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.